‘बालिका वधू फेम आनंदी अर्थात अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं 1 एप्रिल 2016 रोजी वयाच्या 24 व्या वर्षी आयुष्य संपवलं. मुंबईतील एका अपार्टमेंटमध्ये अभिनेत्रीने (Actress) गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. या प्रकरणात तिच्या पालकांनी अभिनेत्रीच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी आता मोठा ट्विस्ट आला आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high court) प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणातील सशंयित आरोपी राहुल राज सिंह याला निर्दोष मुक्त केलं आहे. हा निर्णय देऊन राहुल राज सिंहला मोठा दिलासा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असल्याचा आरोप राहुलवर होता. पण या प्रकरणात आता मुबंई उच्च न्यायलयाने हा निर्णय दिला आहे.
1 एप्रिल 2016 रोजी गोरेगावातील राहत्या घरात प्रत्युषाचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. आत्महत्यापूर्वी प्रत्युषा आणि राहुल यांच्यात शेवटचं संभाषण झालं होतं. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठानं प्रत्युषा आणि राहूल यांच्यातील शेवटचं संभाषण महत्त्वपूर्ण मानलं. राहुलविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. राहुलच्या शेवटच्या संभाषणातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सिद्ध होत नसल्याचं बचाव पक्षाने युक्तिवाद केला. ज्येष्ठ वकील आबाद पोंडा आणि अॅड. श्रेयांश मिठारे यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आहे. दरम्यान, न्यायाधीश शिवकुमार डिगे यांनी राहुलची आरोपातून मुक्ती केली. राहुलविरोधातील पुढील खटला थांबला; आता त्याला ट्रायलला सामोरे जावे लागणार नाही.
नेमकं प्रकरण काय?
प्रत्युषा आपल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. तेव्हा अभिनेत्री राहुल राज सिंह याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. आत्महत्या करण्यापूर्वी प्रत्युषा आणि राहुल यांच्यात संभाषण झालं होतं. आत्महत्येनंतर राहुलने तिला तातडीने रुग्णालयात नेलं. दरम्यान, डॉक्टरांनी तपासून अभिनेत्रीला मृत घोषीत केलं. या संपूर्ण घटनेनंतर प्रत्युषाच्या आई – वडिलांनी राहुल विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राहुलविरोधात विविध आरोपांखाली एफआयआर दाखल केली होती. हे प्रकरण समोर येताच सिनेसृष्टीत खळबळ उडाली.
राहुलचे प्रतिनिधित्व करणारे वकील आबाद पोंडा आणि श्रेयांश मिठार यांनी युक्तीवाद केला. या युक्तीवादात वकिलांनी राहुलने, प्रत्युषाला आत्महत्या करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं. दोघेही लिव्ह – इन रिलेशनशिपमध्ये होते. घटनेच्या दिवशी राहुलने आपली गाडी तातडीने प्रत्युषाकडे वळवून घेतली. पण तेव्हा प्रत्युषा, हे आपलं शेवटचं बोलणं असेल, असं म्हणाली.




























































