ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते विद्यानंद बापटांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अमोल पालेकरांनी विद्यानंद बापटांचं सर्वांदेखत कौतुक केलंय. 

0
9

विद्यानंद बापट यांनी डीजे आणि लाऊडस्पिकर विरोधात भूमिका घेतली आणि अख्ख्या महाराष्ट्रभरात चर्चेत आले. त्यांनी ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून डीजे आणि लाऊडस्पिकरविरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांचा कोणत्याही विषयावरचा युक्तिवाद, त्यांचं मराठी आणि त्यांना समाजभान राखून उचललेलं पाऊल, यासाठी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पुण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. पुण्या मधुरजग फाउंडेशन, ब्राइट्स सोसायटी, विचारवेध यांच्यावतीनं आयोजित ‘आवाज शांततेचा’ कार्यक्रमात विद्यानंद बापट यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते विद्यानंद बापटांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अमोल पालेकरांनी विद्यानंद बापटांचं सर्वांदेखत कौतुक केलंय. 

सार्वजनिक धार्मिक उत्सवांमधील ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांच्या त्रासाविरोधात विद्यानंद बापट यांनी उभारलेला संघर्ष हा नागरिकांनी व्यवस्थेविरुद्ध उभारलेल्या व्यापक संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो, असं अमोल पालेकर म्हणाले. पुढे बोलताना माझ्या लेखी महत्त्वाचं योगदान म्हणजे, विद्यानंद ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरच थांबला नाही, तर बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकतेचाही पाठपुरावा केला, असंही अमोल पालेकर म्हणाले आहेत. 

अमोल पालेकर विद्यानंद बापटांवर नेमकं काय म्हणाले

‘आवाज शांततेचा’ कार्यक्रमात बोलताना अमोल पालेकर म्हणाले की, “आपण सगळे फक्त समविचारीच नाही, तर एका वेगळ्या अर्थानं आपण कनव्हर्स आहोत, म्हणजे आपण आधीच बदललो आहोत, असं मला वाटतं. विद्यानंद बापट यांचा जो कौतुक सोहळा आहे, त्याबद्दल सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलंय. मी एक टिपण लिहून आणलंय…” 

स्वतःसोबत लिहून आणलेला मजकूर वाचताना अमोल पालेकर म्हणाले, “आज विद्यानंदचं कौतुक करायला आपण इथे जमलो आहोत. गणपती उत्सवात किंवा थोड्या व्यापक दृष्टीनं सगळ्या धार्मिक उत्सवांमधून होणारं ध्वनी प्रदूषण आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास हा त्याच्या मोहिमेचा मुख्य मुद्दा होता. विद्यानंदचं कौतुक अशासाठी की, त्यानं संयमानं, फारसा तोल ढळू न देता सगळ्या विरोधाला युक्तिवाद करून उत्तरं दिली. प्रसंगी संस्कृत श्लोकांचे दाखले देण्याच्या त्याच्या शैलीमुळे आणि अभ्यासपूर्ण विवेचनामुळे विरोधकांची पंचाईत झाली. स्वतःच्या भूमिकेचा पुनरूच्चार ठामपणे आणि न कंटाळता करणं ही देखील एक कौतुकाची बाब आहे…”, असं अमोल पालेकर म्हणाले.

विद्यानंद बापटांवर बोलताना अमोल पालेकर पुढे म्हणाले की, “माझ्या लेखी महत्त्वाचं योगदान म्हणजे, विद्यानंद ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरच थांबला नाही, तर बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकतेचाही पाठपुरावा केला. ही लाखमोलाची बाब आहे. भर गणेशोत्सव तोंडावर असताना मी नास्तिक आहे, हे सांगण्याचं धाडस भलेभले करणार नाहीत. नास्तिकांच्या भूमिकेला समजून न घेणारी मंडळी, नास्तिक म्हणजे, अश्रद्ध असं सोपं समीकरण करतात. विद्यानंद त्यालाही थेट छेद देतो. त्याची समाजहिताबाबतची निष्ठा ही त्याची निष्ठा ठरते. पॅट्स हिज फेथ… तो नास्तिक असूनही बहुतांश सर्वसामान्य पुणेकर त्याच्यामागे उभे राहिले हे पण विशेषच म्हणावं लागेल. मुंबई उच्च न्यायालयानं सुमोटो म्हणजे स्वतःहून ध्वनी प्रदूषणावर सरकार काय उपाययोजना करतंय यात लक्ष घातलंय…”

एका व्यक्तीचा आवाज कदाचित कुजबुज वाटेल, पण…: अमोल पालेकर

अमोल पालेकर म्हणाले, “सार्वजनिक धार्मिक उत्सवांमधील ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांच्या त्रासाविरोधात विद्यानंद बापट यांनी उभारलेला संघर्ष हा नागरिकांनी व्यवस्थेविरुद्ध उभारलेल्या व्यापक संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो. व्यवस्थेकडून मिळणारे अन्यायकारक निर्णय बोटचेपेपणाने स्वीकारण्यापेक्षा प्रत्येकाने नागरी प्रश्नांवर वैयक्तिक पातळीवर आवाज उठवून प्रतिकार केला पाहिजे. एका व्यक्तीचा आवाज कदाचित कुजबुज वाटेल, पण अशा अनेक आवाजांची मिळून एक दिवस मोठी गर्जना बनते.”

दरम्यान, अमोल पालेकर यांच्याबरोबर यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमिंत, अभिनेते सुमित राघवन, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि कुमार नागे उपस्थित होते. 

LEAVE A REPLY